क्रिकेट हा मुळातच सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यातही सिनेमा आणि क्रिकेट यांचा मेळ म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच. अशीच मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे इरॉस इंटरनॅशनल व एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, गणराज असोसिएट निर्मित आणि श्रेयस जाधव दिग्दर्शित ‘मी पण सचिन’ चित्रपट. खेळ असो, नाहीतर आयुष्य, शेवटचा टप्पा पडल्याशिवाय कधीही हार मानायची नाही, असा प्रेरणादायी संदेश ह्या चित्रपटाच्या टीझर मधून दाखवण्यात आलंय. ह्या चित्रपटात स्वप्निल जोशी हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ह्या चित्रपटासंदर्भात रॅपर, दिग्दर्शक आणि लेखक श्रेयस जाधव यांनी कॅफेमराठीशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
‘मी पण सचिन’ असं जरी चित्रपटाच नावं असलं तरी हा चित्रपट सचिन तेंडूलकरवर आधारित नाही. हा चित्रपट सचिन तेंडूलकरच्या लाखो-करोडो चाहत्यांपैकी एका होतकरू क्रिकेटपटू वर आधारित आहे. सचिन तेंडूलकर हा क्रिकेटचा देव आणि लॉर्ड ही क्रिकेटची ‘पंढरी’ असं तो मानत असतो. सचिन तेंडूलकर ज्याप्रमाणे लॉर्ड वर जाऊन क्रिकेट खेळला तसच लॉर्ड वर जाऊन एकदा तरी क्रिकेट खेळायचं त्याचं स्वप्न असत. ह्याच स्वप्नाचा मागोवा घेणारा हा चित्रपट असल्याचं श्रेयस कॅफेमराठीशी बोलताना सांगत होता. एखादी गोष्ट साध्य करण्यामागची जिद्द, चिकाटी ह्या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल असंही श्रेयस म्हणाला. श्रेयसने ह्या आधीही बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केलेय. परंतु चित्रपटाची कथा लिहिणे आणि मग ती दिग्दर्शित करणे हे एक आव्हानच होते. त्यावेळी अनेक अडचणीही आल्या पण कुठेही माघार न घेता सर्व अडचणींना सामोरे जावून चित्रपट तयार केला असल्याचं श्रेयस म्हणाला. क्रिकेटची खूपच आवड असल्यामुळे आणि असा विषय मराठी चित्रपटसृष्टीत अजून तरी अशा पद्धतीने हाताळलेला नसल्यामुळे हा विषय लोकांसमोर मांडण्यासाठी ह्या चित्रपटची निर्मिर्ती केल्याचे श्रेयस सांगत होता. ह्या चित्रपटात स्वप्निल जोशी हा ‘सचिन’ची भूमिका साकारतोय. चित्रपटात तो दोन वयोगटात दिसून येण्यासाठी जवळजवळ स्वप्निलने १५ किलो वजन कमी केल्याचे श्रेयस सांगत होता. “दिग्दर्शनाची मला आवड आहे आणि रॅपिंग करणे हा माझा छंद आहे”. ह्या चित्रपटामध्ये देखील श्रेयसने एक रॅप केलेला आहे आणि हा रॅप नक्कीच प्रेक्षकांना आवडेल असं श्रेयस म्हणाला. शुटींग दरम्यानही खूप मजा मस्ती केली आणि सर्वांनी मजामस्ती करत सर्व शूटिंग झाल्याचे तो सांगत होता.
सचिन तेंडूलकरच्या तत्वांवर चालणारा माणूस आयुष्यात कुठच्या शिखरावर पोहचू शकतो हे ह्या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटात स्वप्निल जोशी सोबतच प्रियदर्शन जाधव, अभिजित खांडकेकर, कल्याणी मुळ्ये, अनुजा साठ्ये-गोखले, अनिनाश नारकर, सुनिता थाटे हे देखील दिसून येणार आहेत. मजा, मस्ती, इमोशन, जिद्द, चिकाटी अशा सर्व गोष्टींचा एकत्रित पॅकेज असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा श्रेयसने व्यक्त केली आहे. मनाला भिडणारा असा हा विषय लोकांना कितपत रुचेल हे येत्या १ फेब्रुवारीला कळेलच.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0