Direction of Marathi Film Done By Tuzyat Jiv Rangala Fame Aaba…
सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मधून राणाच्या वडिलांच्या भूमिकेतून सर्वांच्या पसंतीस उतरलेले आबा म्हणजेच मिलिंद दास्ताने यांनी नुकताच “हिच्यासाठी काय पण” या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. मिलिंद दास्ताने यांनी याआधी देखील बरीच नाटकं दिग्दर्शित केली आहेत. तसेच त्यांनी लहान मुलांसाठी देखील नाटकं बसवली आहेत. त्यामुळे दिग्दर्शन हाच माझा पिंड आहे असे मिलिंद यांनी सांगितले. अभिनय क्षेत्रात प्रवेश घेताना सर्वात आधी जब्बार पटेल यांच्या डॉ. आंबेडकर सिनेमामध्ये प्रोडक्शनचं काम केलं. तसेच लेक लाडकी या घरची या मालिकेमध्ये मिलिंद यांनी काकाची भूमिका निभावली. दिग्दर्शक म्हणून ‘आजी आजोबा’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. पण कमर्शियल म्हणून ‘हिच्यासाठी काय पण’ हा पहिला सिनेमा होईल असे ते म्हणाले.
“हिच्यासाठी काय पण” या सिनेमाविषयी सांगताना मिलिंद यांनी सांगितले की, काही कारणामुळे हा सिनेमा त्यांच्याकडे आला. दिग्दर्शनाविषयी बोलताना ते म्हणाले की, दिग्दर्शन हा माझ्या आवडीचा विषय. कारण “अभिनय करताना अभिनेता हा एकाच भूमिकेचा विचार करतो मात्र, दिग्दर्शन करताना दिग्दर्शकाला सगळ्या भूमिकांचा विचार करावा लागतो त्याचप्रमाणे कथानकाचाही विचार करावा लागतो. या सगळ्या सोबतच दिग्दर्शकाला सगळ्या तांत्रिक गोष्टींचा ही अभ्यास असणे गरजेचे असते. मात्र आजकाल कोणी ही उठून दिग्दर्शन करतं याबद्दल मिलिंद यांनी खंत व्यक्त केली. अभिनय हे क्षेत्र असे आहे ज्यात कोणी परिपूर्ण नसतं. प्रत्येक जण शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. कारण रोज काही ना काही गोष्टी घडत असतात आणि त्यातून शिकत राहणं प्रत्येक अभिनेत्यासाठी गरजेचं असतं. त्यामुळे या क्षेत्रात अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून विद्यार्थी बनून शिकत राहावं लागतं.”
हिच्यासाठी काय पण हा सिनेमा एक मेसेज देऊन जातो की, “तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, भविष्य, बुवाबाजी या सर्व गोष्टी थोतांड आहेत. भविष्यावर पूर्णपणे विसंबून राहिलात तर तुमच्या कर्तृत्वाला काहीच अर्थ राहत नाही.” येत्या १३ एप्रिलपासून हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सिनेमात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, निर्मिती सावंत, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि विजय चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सिनेमाला हर्षित अभिराज यांचे संगीत लाभले आहे. उज्वला पोळ कार्यकारी निर्मात्या आहेत.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0